नवी मुंबई : पालकमंत्री गणेश नाईक यांनी बेलापूर तर आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघातून आज आपले उमदेवारी अर्ज दाखल केले. विकासाच्या मुद्द्यावरच आपण या निवडणुक ीला सामोरे जाणार आहोत, विकासाच्या बाजूनेच जनता कौल देईल, असे प्रतिपादन गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीद्वारे दोन्ही मतदार संघांतील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. बेलापूरमध्ये दुपारी दीड वाजता कल्पना जगताप-भोसले आणि ऐरोलीमध्ये दुपारी बारा वाजता वीरकर या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक व संदीप नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. चोवीस तास पाणीपुरवठा, दळणवळणाच्या सोयीसुविधा, आधुनिक शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सोयी, औद्योगिक क्षेत्राचा विकास, मलनि:सारण व्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर विकासकामांमध्ये काही प्रवृत्तींनी खो घालण्याचा प्रयत्न केला. या समाजविघातक प्रवृत्तींना जनतेने नाकारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे मत गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्याचे भूखंड मिळवून देण्यासाठी राज्यातील पहिला लढा मी सुरू केला होता. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सिडकोच्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी कोणताही पक्षभेद केला नाही. या आंदोलनाला यशही आले आहे. गरजेपोटीच्या बांधकामांना शासनाकडून संरक्षण मिळवून दिले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वासही पालकमंत्री नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून सर्व घटकांना सोबत घेवून विकास साधला आहे. नागरी सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प अशा सर्वच विषयात नवी मुंबई शहर इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे. सामाजिक कार्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामुळे नवी मुंबईची सुज्ञ जनता विकासाच्या बाजूनेच कौल देईल, असा दुर्दम्य विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला. दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, महापौर सागर नाईक, कामगारनेते अशोक पोहेकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, महिला अध्यक्षा कमलताई पाटील, युवक अध्यक्ष जयेश कोंडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गणेश नाईक, संदीप नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: September 26, 2014 01:44 IST