Join us  

गणेश मंडळाजवळ वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले, गणेश मंडळातील तीन सदस्यांनी चोराचा पाठलाग करत पोलिसांच्या स्वाधीन केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:00 AM

सणासुदीदरम्यान महिलांना टार्गेट करून, त्यांचे दागिने हिसकावून पळण्याचे अनेक प्रकार अद्याप घडले आहेत. दहिसरमध्येही मंगळवारी वृद्धेचे दागिने हिसकावून पळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुंबई : सणासुदीदरम्यान महिलांना टार्गेट करून, त्यांचे दागिने हिसकावून पळण्याचे अनेक प्रकार अद्याप घडले आहेत. दहिसरमध्येही मंगळवारी वृद्धेचे दागिने हिसकावून पळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्थानिक गणेश मंडळातील तीन सदस्यांनी चोराचा पाठलाग करत, त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.शुभांगी शंकर कदम (६०) या दहिसर पूर्वच्या अशोकवनमध्ये पॅनोरमा पार्क या ठिकाणी राहतात. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास, त्या शिववल्लभ रोडवरून पायी निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या पाठीमागून दोन बाइकस्वारांनी त्यांचे मंगळसूत्र व कंठीमणी माळ खेचून पळण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याच वेळी त्या ठिकाणाहून काजूपाडातील ओमसाई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य रोहित साळुंखे, नदीम शेख आणि प्रदीप बुटे हे रिक्षाने निघाले होते. कदम यांचा आवाज ऐकून त्यांनी रिक्षातून या चोरांचा पाठलाग करून, दोन चोरांपैकी उस्मान उमर खान (३०) याला पकडले. मात्र, त्याचा फरार झालेल्या साथीदार सर्फराज साजिद अन्सारी (३१) याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केले.दरम्यान, रोहित साळुंखे, नदीम शेख आणि प्रदीप बुटे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल, परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गणेश मंडळातच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

टॅग्स :गुन्हा