Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजुकायाची २२ फुटी कागदी लगद्याची गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:01 IST

मार्च महिन्यापासून सुरू होते काम : वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये होणार नोंद

मुंबई : गणेशोत्सवामध्ये लालबाग-परळ येथील गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी विविध रूपातील गणेशमूर्ती साकारून गणेशभक्तांना मोहित करते. या वर्षी २२ फुटांची कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. ही गणेशमूर्ती यंदा गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे़ याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये करण्यात येणार आहे. देशातील पहिली २२ फुटांची कागदी लगद्यापासून तयार केलेली ही गणेशमूर्ती असल्याचा दावा मंडळाने केला आहे.

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष सुशांत शिंदे यांनी सांगितले, तेजुकाया मंडळाची गणेशमूर्ती मूर्तिकार राजन झाड यांनी साकारली आहे. शासनाच्या पर्यावरणपूरक विषयाला अनुसरून घरगुती मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती शाडू मातीच्या बनविल्या जात नाहीत. मंडळाने कागद, शाडू माती आणि डिंक यांचे मिश्रण करून दीड टन वजनाची मूर्ती तयार केली आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा जागर करण्यासाठी ही मूर्ती साकारण्यात आली आहे. प्रत्येकाने पर्यावरणाशी जोडले जावे, पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा हा मुख्य हेतू आहे.

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे सचिव संकेत हुले यांनी सांगितले की, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे काम हाती घेतले होते. आता गणेशमूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ४ सप्टेंबर रोजी वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियामध्ये या २२ फुटी कागदी गणेशमूर्तीची नोंद केली जाणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूर येऊन मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांना मदत स्वरूपात २ ते ३ लाखांचे साहित्य पुरविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ५ ते ६ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. अनंत चतुर्थीपर्यंत अनेक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी तयार केली

कागदाचा लगदा, शाडूची माती, डिंक यांचे मिश्रण तीन ते चार दिवस कुजविले जाते. मिश्रणादरम्यान व्हाईटिंग पावडर व शाडूच्या मातीचे मिश्रण तयार केले जाते. कागद कुजल्यामुळे गणेशमूर्तीला घट्टपणा येतो. कागदी लगद्यापासून बनविण्यात आलेली गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन केल्यावर पाऊण तासात विरघळते.- अजित खोत, मूर्तिकार

टॅग्स :गणेश महोत्सवगणेश मंडळ 2019