Join us

गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यांतून !

By admin | Updated: August 14, 2014 00:27 IST

मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरु आहे

वडखळ : मुंबई- गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे वीस आॅगस्टपर्यंत हे खड्डे भरून होतील का, अशी शंका गणेशभक्तांकडून उपस्थित होत आहे. एकोणतीस आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईस्थित चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येतात. त्यांचे स्वागत खड्ड्यातून होणार आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण न झाल्यास गणेशभक्तांना कंबरतोड प्रवास करावा लागणार आहे.गणेशोत्सवाच्या पाच सहा दिवस आधी महामार्गावर वाहनांची रहदारी सुरु होत असते. त्यामुळे हजारो वाहने एकाच दिशेने जाणारी असल्याने महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात मोठी वाहतूक कोंडी होते. महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून पालकमंत्र्यांनी वीस आॅगस्टपूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की नियोजित तारखेपर्यंत महामार्गची दुरुस्ती होईल,याबाबत शंका वाटते. मार्गावर माती, दगड, खडी यांनी खड्डे भरण्याचे काम चालू असले तरी लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी खड्डे तयार होतात. वडखळ ते तरणखोप या बारा किलोमीटरपर्यत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तर वडखळपासून पुढे नागोठणे पर्यत महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे वाहने बिघडण्याचे प्रमाणही वाढत असून रस्त्यात वाहने बंद पडून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती करुन प्रवास सुखकर करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.