Join us  

''पुन्हा एकदा गांधीहत्या होऊ देणार नाही''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 6:07 AM

केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा विभाजन करणारा आहे.

मुंबई : केंद्र सरकारचा नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा विभाजन करणारा आहे. आम्ही पुन्हा एकदा देशाची फाळणी होऊ देणार नाही. महात्मा गांधी यांची हत्या होऊ देणार नाही, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरूवारी व्यक्त केली. सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील महात्मा गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखविला.केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, बिघडलेली अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवर केंद्र सरकारला लक्ष्य करत सिन्हा यांनी यात्रेचे आयोजन केले. गेट वे आॅफ इंडिया येथून निघालेली ही यात्रा गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणामार्गे ३१ जानेवारीला दिल्लीतील राजघाट येथे पोहोचणार आहे.शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारच्या हुकुमशाहीला महात्मा गांधींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घटनेचा संपूर्ण देशाने विरोध केला आहे. कागदपत्र नसतील तर हे सरकार छावणीत पाठवेल अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. आज देशात जे वातावरण आहे, त्यावर जनता नाराज आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत असून त्यांना दिशा द्यायला हवी. सरकारच्या हिंसाचाराला, हुकुमशाहीला महात्मा गांधींजींचा अहिंसक मार्गानेच विरोध करायला हवा.अल्पसंख्याक मंत्री नवाबमलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचेनेते प्रकाश आंबेडकर, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.सायंकाळी ही यात्रा पुण्यात आली. कोथरूड येथील गांधी भवनमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा तसेच आशिष देशमुख यात्रेसोबत होते. गांधी भवनचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी त्यांचे स्वागत केले.>गेट वे आॅफ इंडिया येथे राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून महात्मा गांधी शांती यात्रेची बुधवारी सुरुवात केली. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा,वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :शरद पवारयशवंत सिन्हा