मुंबई : स्वच्छता मोहिमेसारख्या अभियानातून महात्मा गांधींना ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ एखाद्या विशिष्ट धर्माचा उन्माद आणि पगडा गांधींना अमान्य होता. त्यामुळे आता थेट महात्मा गांधींनाच वाचविण्याची वेळ धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांवर आली आहे, असे परखड मत आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी प्रेस क्लबमधील परिसंवादात मांडले.
लोकसभेनंतर महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाचा अन्वयार्थ लावण्यासाठी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यादव म्हणाले की, मनमोहन सिंग यांचे निष्प्रभ नेतृत्व, विकासाचा रुतलेला गाडा आणि बहुसंख्य समाजात निर्माण झालेली अस्वस्थता भाजपाच्या पथ्यावर पडली. केंद्रात नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून मोदी पुढे आल्याचे यादव म्हणाले. मोदींसाठीचे हे अनुकूल वातावरण प्रत्यक्ष विजयात रुपांतरीत करण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वाखाली मोठी निवडणूक यंत्रणा राबल्याचे त्यांनी सांगितले.
अटलबिहारी वाजपेयींच्या सर्वसमावेशक राजकारणापासून मोदींनी फारकत घेतली. धर्मनिरपेक्ष विचारवंतांनी वर्तविल्याप्रमाणो मोदी अथवा त्यांचे सरकार धार्मिक उन्मादाचे राजकारण करत नसल्याचे वरकरणी दिसत नाही. मात्र प्रत्यक्षात देशातील कानाकोप:यात मुस्लीमविरोधी वातावरण तयार झाले आहे. काँग्रेसच्या ताब्यातील राज्यातही प्रशासनातील हा बदल जाणवत असल्याचा आरोप यादव यांनी केला. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. अशा परिस्थितीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठीची धमक आणि इच्छाशक्ती सध्या पक्षात दिसत नाही. आगामी काळात काँग्रेसचा आणखी संकोच होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. (प्रतिनिधी)
दिल्लीत केजरीवालच !
देशात मोदी आणि भाजपासाठी अनुकूल वातावरण दिसत असले तरीही दिल्ली विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. अरविंद केजरीवाल यांनाच दिल्लीकरांची पसंती असल्याचा दावा यादव यांनी केला.