Join us

किसननगरच्या बालमित्र मंडळाचा एक गाव एक गणपती

By admin | Updated: September 8, 2014 01:12 IST

एक गाव एक गणपती या संकल्पनेला ग्रामीण भागात भाविकांनी अधिक पसंती दिली असली तरी ठाण्याच्या किसननगर भागातही ही संकल्पना गेल्या १५ वर्षांपासून राबविली जात आहे

जितेंद्र कालेकर, ठाणे एक गाव एक गणपती या संकल्पनेला ग्रामीण भागात भाविकांनी अधिक पसंती दिली असली तरी ठाण्याच्या किसननगर भागातही ही संकल्पना गेल्या १५ वर्षांपासून राबविली जात आहे. तब्बल १० ते १२ मंडळ एकत्रित येऊन बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हा एक गाव एक गणपती उत्सव मोठया दिमाखात आणि जल्लोषात साजरा होतो. या मंडळाची १९७६ मध्ये स्थापना झाली. यंदा ३८ वे वर्ष साजरे करण्यात आले. १५ वर्षांपूर्वी या मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याची कल्पना इतर मंडळांकडे व्यक्त केली. इतर मंडळांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आल्याची माहिती मंडळाचे सेके्रटरी पांडुरंग आवटी यांनी दिली. त्यानंतर सेव्हन अप, कमांडो, शिवनेरी, सिद्धीविनायक, शिवनेर, गजानन भाजी मंडई, बालाजी मित्र मंडळ आणि अष्टविनायक अशी किसननगरची १० ते १२ मंडळे यात सहभागी झाली.मंडळाच्यावतीने देणगीसाठी कुठेही सक्ती केली जात नाही. तरीही कमीत कमी २५१ आणि जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यत वर्गणी व्यापारी तसेच रहिवासी या मंडळाकडे उत्स्फूर्तपणे जमा करतात. जी इतर मंडळे यात सहभागी झाली आहेत, तेही वर्गणीसाठी फिरत नाहीत. तरीही मंडळाकडे यंदा वर्गणी आणि जाहिरातीच्या रुपाने सहा लाखांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये दीड ते दोन लाखांची वर्गणी, शुभेच्छा जाहिराती तीन लाख आणि दानपेटीतून ८० ते ९० हजार रुपये जमा होत असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. अर्थात, त्यातील सव्वा लाखांच्या रक्कमेतून मूर्तीची खरेदी करण्यात आली आहे. तर अडीच लाखांचा राजस्थानी मंडप साकारण्यात आला आहे. ८० हजारांच्या खर्चातून थर्माकोलचे मंदीर उभारण्यात आले आहे. बाप्पाचे आगमन आणि विसर्जनासाठी तसेच दहा दिवसांच्या उत्सव काळात सर्व कार्यकर्ते एकदिलाने कार्य करीत असतात.