Join us

अक्षरांच्या तालावर गणपती बाप्पा नाचे!

By admin | Updated: September 9, 2016 03:29 IST

गणेशोत्सवात सर्व गणेशभक्त मग्न आहेत, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठांसह चिमुरडे आणि तरुणाईही यात अग्रेसर आहे.

रामेश्वर जगदाळे, मुंबईगणेशोत्सवात सर्व गणेशभक्त मग्न आहेत, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठांसह चिमुरडे आणि तरुणाईही यात अग्रेसर आहे. टीशर्ट्स, फोटोस् आणि सार्वजनिक बाप्पांचे दर्शन घेण्यात तरुणाईचा पुढाकार आहे. मात्र सध्या आणखी एक ट्रेंड तरुणाईमध्ये रूढ होतो आहे. आपल्या नावातच बाप्पाचे रूप शोधण्याचा ट्रेंडही सोशल मीडियावर हीट होतो आहे.सुलेखनातून बाप्पा रेखाटणारे अनेक अक्षरगणेश कलाकार सध्या या कलेद्वारे बाप्पाची सेवा करीत आहेत. शिवाय, सध्या या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्याची रीतही सुरू झाली आहे. याविषयी, अक्षरगणेश कलाकार आशिष तांबे सांगतो की, लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. मात्र केवळ चित्र रेखाटण्यापेक्षा काहीतरी नावीन्यपूर्ण करावे या विचारातून ही कला शिकण्यास सुरुवात केली; आणि काही काळातच विविध गोष्टींचा वापर करून अक्षरगणेश रेखाटण्यास सुरुवात केली. या कलेची साथसोबत करत आता ७ वर्षांचा टप्पा उलटला. कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना या कलेची भेट दिली. त्या सगळ्यांकडून अगदी कौतुकाने प्रोत्साहन मिळाले. सध्या मुंबई शहर-उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या साथीने नवा उपक्रम हाती घेतला आहे. या मंडळांच्या सहकार्याने केलेल्या कलाकृतींची विक्री करून त्या माध्यमातून उभारलेला निधी ‘नाम’ संस्थेला सुपुर्द करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ््या कलेकडे ‘करिअर’ म्हणून पाहणाऱ्या परळच्या अभिषेक चिटणीस याने सांगितले की, घरातून कलेचा वारसा मिळाला होता, ती परंपरा अक्षरगणेश कलेद्वारे पुढे नेत आहे. आजवर मराठी चित्रपटसृष्टीतील १२०, तर हिंदी सिनेसृष्टीतील १० कलावंतांना अक्षरगणेशची भेट दिली आहे. गेल्या वर्षी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अक्षरगणेश भेट दिला, त्या वेळी त्याच्यासोबत घालविलेली सात मिनिटे अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली. अभिनेत्री शर्वाणी पिल्ले हिनेसुद्धा पुरस्कारापेक्षा ही कलाकृती म्हणजे मोठी पोचपावती असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या कलेची सेवा बाप्पाच आपल्या हातून घडवित आहे, अशी भावना झाल्याने या कलेत अधिकाधिक नवीन गोष्टी साकारण्याचा मानस असल्याचे त्याने सांगितले.