आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
सरकारी मूकबधिर विद्यालयाचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करण्यासाठी आगाऊ रक्कम भरून सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दीड वर्षात मुहूर्त सापडलेला नाही. या इमारतीची प्रचंड प्रमाणात वाताहात झालेली असल्याने ती कधी कोसळले याची शाश्वती नाही. त्यामुळे याबाबत काही बरेवाईट झाल्यास याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
1963 साली अलिबाग येथील नागाव येथे सरकारी मूरबधीर विद्यालयाची स्थापना झाली. प्रशस्त इमारत असावी त्या दृष्टीने अलिबाग विद्यानगर येथे 1984 साली इमारतीचे भुमिपूजन करण्यात आले, तर जुलै 1987 साली प्रत्यक्षात त्या इमारतीमध्ये शाळा सुरु करण्यात आली. सध्या या शाळेमध्ये 14 मुले आणि सहा मुली प्राथमिक शिक्षण घेत आहेत. याच इमारतीमध्ये वसतीगृहही आहे. तसेच विशेष शिक्षक तीन आणि कनिष्ठ काळजी वाहक एक असे कर्मचारी त्याच इमारतीमध्ये राहतात.
इमारतीला सुमारे 27 वर्ष झाली आहेत. या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणचा स्लॅब कोसळला आहे, तर काही कोसळण्याच्या स्थितीत असून बिम आणि पिलरला तडे गेले आहेत. त्यामुळे इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी इमारतीचे स्टॅक्चरल व सेफ्टी ऑडीट करावे यासाठी प्रथम 21 फेब्रुवारी 2क्13 रोजी पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली होती. त्यानंतर सातत्याने स्मरणपत्रेही पाठविली आहेत. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाला एकदाही वेळ मिळालेला नाही. 29 मे 2क्14 रोजी तीन लाख 75 हजार रुपयांचा धनादेश फि स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. या घटनेला आता सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे.
विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षक येथे आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. याची साधी जाणीव सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही हि अतीशय गंभीर बाब आहे. समाज कल्याण अधिकारी यांनी उपअभियंता दिलीप विडेकर यांना स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडीट करण्याबाबत दूरध्वनीवरुनही संपर्क साधून विनंती केली आहे. तरी देखील त्यांना अद्याप जाग आलेली
नाही.