ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा 'दादासाहेब फाळके' पुरस्कार प्रदान करण्यात आला. पृथ्वी थिएटरमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कपूर यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. कपूर यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा चित्रपट असलेल्या 'जंजीर' चित्रपटातील 'मेरे पास माँ है ' हा त्यांचा संवाद खूप गाजला होता आणि आज मदर्स डेच्या दिवशीच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने एका वेगळाच 'योगायोग' साधला गेला हे विशेष...दरम्यान या सोहळ्यासाठी ऋषी कपूर, नीतू कपूर, अमिताभ बच्चन, वहिदा रेहमान, रेखा, हेमामालिनी, राज ब्बबर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात शशी कपूर यांचा नातू आणि अबिनेता रणबीर कपूर याच्या आवाजातील एक खास डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशी कपूर यांना ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यास जाता आले नव्हते. त्यामुळे त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पृथ्वी थिएटरमध्ये या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कपूर परिवारात तिस-यांदा हा पुरस्कार दिला जात आहे. कपूर परिवाराने त्यांचे विचार व त्यांच्या अप्रतिम कलाकारीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हा पुरस्कार परिवारातला अखेरचा पुरस्कार नसले, हीच परंपरा पुढेही अशीचा चालत राहील याची मला खात्री आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले.