Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर भागातील सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्यांपैकी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर भागातील सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्यांपैकी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या उत्तर प्रदेशातून मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आवळल्या. विनय कुमार सिंह उर्फ सिंतू सिंह (४७), शैलेंद्र मुरारी मिश्रा (४२) व दिनेश कलऊ निशाद (२४) अशी अटक केलेल्या तिघा दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाइल, ३५ लाखांचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले.

शांतीनगर सेक्टर ५ मध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एस. कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी या सराफा दुकानात ७ जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ग्राहक बनून आलेले चार दरोडेखोर आतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ५४ लाखांचे दागिने लुटून पसार झाले होते. एका दुचाकीवरून दोन दरोडेखोर पसार झाले, तर दोन दरोडेखोरांना त्यांची दुचाकी सुरू न झाल्याने ती तेथेच टाकून पळावे लागले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला. सापडलेली दुचाकी ही नालासोपारा येथून चोरीला गेल्याचे उघड झाले होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते व अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी व प्रमोद बडाख यांचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशात दरोडेखोरांच्या शोधात होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स टीम दरोडेखोरांचा आझमगढ, जौनपूर, गाझीपूर व लखनऊ भागात शोध घेत होती. अखेर बुधवारी पोलिसांना लखनऊ भागातून तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. तिघेही दरोडेखोर उत्तर प्रदेशचे असून, त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दरोड्यातील आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.