Join us

गायतोंडे यांच्या बहुमूल्य चित्राची चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 04:07 IST

जगविख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे वरळी येथील निरलॉन हाऊस येथे लावण्यात आलेले बहुमूल्य चित्र चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई : जगविख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे वरळी येथील निरलॉन हाऊस येथे लावण्यात आलेले बहुमूल्य चित्र चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेले मूळ चित्र न्यूयॉर्क येथील एका कलादालनात असून ‘निरलॉन’मधील सध्या असलेले चित्र मूळ चित्राची नक्कल असल्याचा दावा इमारतीचे भागधारक मथुरादास यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गायतोंडे यांचे १९६० सालातील हे चित्र असून त्याची किंमत सुमारे ५० कोटी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मथुरादास यांच्या म्हणण्यानुसार चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी साकारलेले चित्र १९६०च्या दशकातील आहे. निरलॉन लिमिटेडचा मी भागधारक असल्याने तेथे अनेकदा बैठकींना जातो. तेव्हा प्रत्येक वेळी कंपनीच्या बोर्डरूममधील भिंतीवर गायतोंडे यांच्या पेंटिंग्ज आकर्षित करतात. त्यातील बहुतांश पेंटिंग गायतोंडे यांच्या आहेत. तथापि, अत्यंत बहुमूल्य असलेले गायतोंडे यांच्या एका मूळ चित्राच्या जागी नक्कल असलेले चित्र लावले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. (प्रतिनिधी)