Join us
Daily Top 2Weekly Top 5

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

By संतोष आंधळे | Updated: March 4, 2024 21:48 IST

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दक्षिण मुंबईतीलवैद्यकीय शिक्षण विभागाचे दुसरे वैद्यकीयमहाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आता विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच याठिकाणी नेमणूक केली आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची अंतिम परवानगी लागते.

आयोगाची तज्ज्ञ समिती महाविद्यालय पाहणी करण्यासाठी कधीही येऊ शकतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने अध्यापकांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. २६ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’मध्ये ‘जी. टी. महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग सुकर’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ५६ अध्यापकांच्या नियुक्ती या महाविद्यालयासाठी केल्या आहेत.जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या जी. टी. रुग्णालयाचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनातर्फे लागणारे सक्षमता प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बंधनकारक असणारे संलग्नीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून लागणारी अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. आयोगाची परवानगी मिळाली तर यावर्षी हे महाविद्यालय सुरू होईल, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

राज्य शासनाचे दक्षिण मुंबईत सर जे. जे. रुग्णालय असून, त्याला संलग्न असे ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आहे. या रुग्णालयांतर्गत आणखी जी. टी. कामा आणि सेंट जॉर्जेस, अशी रुग्णालये आहेत. काही महिन्यांपूर्वी हे महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष रस घेऊन त्यांच्या दालनात बैठक घेतली होती. त्यावेळी हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या या महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी जी. टी. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे महाविद्यालय १०० विद्यार्थी क्षमतेचे असून, त्याला संलग्न ५०० बेड्सचे रुग्णालय कार्यान्वित करण्यासंदर्भात काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :वैद्यकीयमहाविद्यालयडॉक्टरमुंबई