Join us  

जी. टी. महाविद्यालयासाठी ५६ अध्यापकांची नेमणूक, आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:39 PM

२६ फेब्रुवारी  रोजी ‘लोकमत’मध्ये ‘जी. टी. महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग सुकर’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मुंबई : दक्षिण मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागाचे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आता विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच याठिकाणी नेमणूक केली आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची अंतिम परवानगी लागते. आयोगाची तज्ज्ञ समिती महाविद्यालय पाहणी करण्यासाठी कधीही येऊ शकतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने अध्यापकांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. २६ फेब्रुवारी  रोजी ‘लोकमत’मध्ये ‘जी. टी. महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग सुकर’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ५६ अध्यापकांच्या नियुक्ती या महाविद्यालयासाठी केल्या आहेत. आयोगाची परवानगी मिळाली तर यावर्षी हे महाविद्यालय सुरू होईल, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी हे महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष रस घेऊन त्यांच्या दालनात बैठक घेतली होती. त्यावेळी हे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या  या महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी जी. टी. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र चिखलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे महाविद्यालय  १०० विद्यार्थी क्षमतेचे असून, त्याला संलग्न ५०० बेड्सचे रुग्णालय असेल.