Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठा पाऊस ठरवणार भूमिगत टाक्यांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई - सखल भाग पूरमुक्त होण्यासाठी भूमिगत टाक्यांचा प्रयोग महापालिका करीत आहे. त्यानुसार परळ हिंदमाता आणि मडके बुवा चौकात ...

मुंबई - सखल भाग पूरमुक्त होण्यासाठी भूमिगत टाक्यांचा प्रयोग महापालिका करीत आहे. त्यानुसार परळ हिंदमाता आणि मडके बुवा चौकात तुंबणारे पाणी तिथे बांधलेल्या भूमिगत टाक्यांद्वारे थेट दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यान आणि परेल सेंट झेवियर्स मैदानात बांधलेल्या टाकीत वळवण्यात येणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील अन्य भागांमध्येही अशाच भूमिगत टाक्या तयार केल्या जाणार आहेत.

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात हिंदमाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर आणि परळमधील मडके बुवा चौक आदी भागात पाण्याचा निचरा होण्यास तीन ते चार तासांचा कालावधी लागला होता. समुद्रातील भरतीच्या वेळेत मोठा पाऊस झाल्यास येथे तीन ते चार फूट पाणी साचते. ही पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यानात ६० हजार घनमीटर व सेंट झेवीयर्स मैदानात ४० हजार घनमीटर क्षमतेचे पाणी साठवण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.

हिंदमाता जवळील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये दीड तासापर्यंतच्या पावसाचे पाणी साठवणे शक्य आहे. त्यामुळे एका तासात १००मि.मी. पाऊस पडला तरी पाणी तुंबणार नाही. कालांतराने या टाक्यांची क्षमताही वाढवली जाणार आहे. त्यामुळे चार तासांमध्ये प्रति तास १०० मि.मी पाऊस पडला तरी येथे पाण्याचा निचरा होऊ शकेल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.

मोठा पावसात खरी परीक्षा....

हिंदमाता येथील दहापैकी आठ पंप हिंदमाता पुलाखाली बसविण्यात आलेल्या टाक्यामधील पाणी उपसून १२०० मि. मी रायझिंग वाहिनीतून प्रमोद महाजन उद्यान टाकीत सोडण्यात येणार आहे. तर उद्यानातील टाकीत जमा झालेले पाणी दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्ग येथील पावसाळी पाणी वाहून नेण्याऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. मात्र मोठा पाऊसच या प्रयोगाची खरी परीक्षा घेणार आहे.