Join us  

भविष्यात ओशिवरा, मिठी नदी मुंबईला बुडवणार; मेट्रो भवन, कारशेड धोकादायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 1:01 AM

‘आरे मॅपिंग’ अभ्यास अहवाल; मेट्रो भवन, कारशेड, एसआरए, प्राणिसंग्रहालय प्रकल्पांचा नद्यांच्या पाणलोटावर परिणाम

मुंबई : आरे कॉलनीमध्ये गेल्या पन्नास वर्षांत विविध प्रकल्प आल्यामुळे येथील ‘ना विकास क्षेत्र’ कमी होऊ लागले आहे. भविष्यात येऊ घातलेल्या नव्या प्रकल्पांमुळे आरेतील नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी असलेला या भूभागाचा संपर्क तुटण्याची शक्यता रहेजा वास्तुस्थापत्य संस्थेच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ या अभ्यासात मांडण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर व सांगलीसारखी महापूरस्थिती मुंबईतही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड एन्व्हॉयर्नमेन्ट स्टडिज्, मुंबईच्या संशोधन विभागाने ‘आरे मॅपिंग’ हा अभ्यास केला आहे. श्वेता वाघ, हुसैन इंदोरवाला, मीनल येरमशेट्टी हे सहायक प्राध्यापक, रेश्मा मॅथ्यू आणि मिहीर देसाई या वास्तुविशारदांचा यात सहभाग आहे. विकास आरखडा, प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन आणि जीआयएस तंत्राचा वापर करून अभ्यास करण्यात आला आहे. आरेमधून उगम पावणाऱ्या ओशिवरा आणि मिठी या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रावर भविष्यात काय परिणाम होतील, याचा यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला आहे. याशिवाय १९४० पासून आतापर्यंत आरेमध्ये आलेल्या प्रकल्पांमुळे जागेचा वापर अनेक वेळा बदलला गेला आहे. त्यामुळे भविष्यातील नैसर्गिक आपत्तींच्या होणाºया परिणामांचा अभ्यास या वेळी करण्यात आला आहे.प्रस्तावित मेट्रो भवन, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील बांधकामे, मेट्रो कारशेड, प्राणिसंग्रहालय अशा अनेक प्रकल्पांचा फटका पाणलोट आणि पूरक्षेत्रास बसेल, हे अभ्यासात मांडण्यात आले आहे.आरेमध्ये उगम पावणाºया नदीपात्राच्या दोन्ही बाजूंस अनेक प्रकल्पांसाठी सिमेंटची भिंत उभारण्यात आली असून, नदीतील पाणी मुरण्यास जागाच शिल्लक नसल्यामुळे एकूणच येथील पूरक्षेत्राला धोका निर्माण झाल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. नद्यांचा उगम आणि सुरुवातीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास पाणी जमिनीत मुरणार नाही. त्यामुळे नदीपात्राच्या खालील भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो, असे हा अभ्यास म्हणतो.ना विकास-हरित क्षेत्रांंची नोंदअभ्यासामधील नोंदीनुसार, मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये दरवेळी आरेमधील ना विकास क्षेत्रात घट झाली आहे.१९६४च्या विकास आराखड्यात १३०० हेक्टर जमीन आरेसाठी दर्शविण्यात आली होती. त्यानंतर, १९८१ मध्ये त्यापैकी ९९० हेक्टर जमीन ना विकास क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यात आली.२०३४च्या विकास आराखड्यात पुन्हा हे क्षेत्र कमी करून ८०० हेक्टर जागा ना विकास क्षेत्र - हरित क्षेत्र म्हणून नोंदविण्यात आली.आरेचा परिसर हा दोन कॅचमेन्ट एरियामध्ये येतो. त्यात एक मिठी व दुसरी ओशिवरा नदीची कॅचमेन्ट एरिया आहे. आम्ही नद्यांच्या पाणलोट क्षेत्राची सीमा दाखविली आहे. नद्यांचा उगम आणि प्रवाहाचा आरंभ कुठे होतो, हे मॅपिंगमध्ये दाखविले आहे. आरेमध्ये कसा विकास होत गेला आणि हिरवळ कशी संपत गेली, हे मॅपिंगद्वारे पाहण्यास मिळाले. मेट्रो ३ चे कारशेड, एसआरए प्रकल्प, प्राणिसंग्रहालय हे नवीन प्रकल्प येणार आहे. तिन्ही प्रकल्पांमुळे मिठी नदीचे कॅचमेन्ट एरिया जो आहे, त्याला धोका निर्माण होणार आहे. काँक्रिटीकरणामुळे नदीचे पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार आहे.- श्वेता वाघ, शहर संवर्धक व सहायक प्राध्यापक, कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चर अ‍ॅण्ड इन्व्हार्यन्मेंट स्टडिज.श्वेता वाघ आणि हुसैन इंदोरवाला केलेल्या अभ्यासाअगोदर मार्च, २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार, मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात एमएमआरसीएलने बांधकाम केले आहे. त्यामुळे मुंबईला पूरस्थितीचा सामना करावा लागतो, तर आता शास्त्रीयदृष्ट्या हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आचोलेकर समितीनुसार, आरेमध्ये मेट्रो ३ चे कारशेड बांधले गेले, तर मुंबई विमानतळ परिसरात पूरस्थिती निर्माण होईल, असे सांगितले होते.- रोहित जोशी, सदस्य, आरे कन्झर्व्हेशन ग्रुप.२०१५ साली डॉ.राकेश कुमार आणि डॉ. श्याम आचोलेकर यांनीदेखील सरकारकडे हीच भूमिका मांडली होती की, आरेमध्ये भराव टाकू नका. त्याचा मिठी नदीवर वाईट परिणाम होईल. त्यातून पुराची स्थिती निर्माण होईल. सरकारला याची जाणीव असते, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात मागचे सरकार कमी पडले. मुंबई शहराला जिवंत ठेवण्यात आरेचे फार मोठे योगदान आहे.- डी. स्टॅलिन, संचालक, वनशक्ती प्रकल्प.