Join us  

उत्पादन शुल्क विभागाला मिळणार सुसज्ज मुख्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 6:51 AM

महापालिका मुख्यालयाशेजारी उत्पादन शुल्क विभागाची जागा आहे. त्या जागेवर मुख्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे

खलील गिरकर 

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाला स्वत:च्या मालकीची सुसज्ज इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय मुख्यालयासाठी महापालिका मुख्यालयाशेजारी ७ मजली इमारत उभारण्यात येणार असून विभागाचे स्वत:च्या मालकीच्या इमारतीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

महापालिका मुख्यालयाशेजारी उत्पादन शुल्क विभागाची जागा आहे. त्या जागेवर मुख्यालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. दोन वर्षांत या इमारतीच्या उभारणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या इमारतीच्या उभारणीसाठी ५१ कोटींचा खर्च होणार असून त्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सध्या मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरीय मुख्यालय कार्यरत आहे. मात्र, येथे कमी जागा असल्याने विभागाच्या विविध कार्यालयांना अत्यंत कमी जागा आहे. विभागाचे राज्यभरात काम चालत असल्याने विभागाच्या मुख्यालयाची सुसज्ज व दिमाखदार इमारत स्वत:च्या मालकीची असावी अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून सातत्याने व्यक्त केली जात होती. अखेर, ही मागणी पूर्ण होत असल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.नवीन इमारतीला हेरिटेज लूकनवीन इमारतीमध्ये विभागाचे आयुक्त, मुख्यालयातील उपायुक्त, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, निरीक्षकांसाठी स्वतंत्र कार्यालये, विभागाचे ग्रंथालय, रेकॉर्ड रूम, आरोपींना ठेवण्यासाठी कस्टडी रूम यांसह विविध अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हेरिटेज दर्जा प्राप्त इमारतीशेजारी ही इमारत उभारण्यात येणार असल्याने या इमारतीलाही हेरिटेज लूक देण्यात येईल. 

टॅग्स :मुंबई