Join us  

फनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 5:44 PM

बाधित इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी उंचीची मर्यादा आहे

 

मुंबई : फनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन नुकतेच नगरविकास, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. फनेल झोन बाधीत रहिवाशांच्या पुनर्विकासाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नुकतीच मंत्री महोदयांबरोबर विभागप्रमुख व परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांच्या सूचनेनुसार नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती अशी माहिती माजी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतला दिली.

सदर बैठकीत बाधित इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी उंचीची मर्यादा आहे. त्याच बरोबर ध्वनी प्रदूषणामुळे अतिरिक्त सदनिका उपलब्ध करणे अडचणीचे असल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी येणाऱ्या बांधकाम खर्चाची तरतूद होईल. त्यानुसार धोरण निश्चित करून निर्णय घेणे गरजेचे आहे अशी भूमिका प्रि.विश्वनाथ महाडेश्वर व जेष्ठ नगरसेवक बाळा नर यांनी मांडली. त्याच बरोबर शासनाने निर्णय घेण्यास वेळेची मर्यादा ठेवणे गरजेचे आहे असे स्थानिक रहिवाशांनी मत व्यक्त केले.सदर बैठकीत  महाडेश्वर  यांनी गेल्या दि, १४ ऑगस्ट रोजी  नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार आयोजित या बैठकीत फनेल झोन बाधित रहिवाशांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले होते असे निदर्शनास आणल्याचे त्यांनी सांगितले.

सदर फनेल झोन मधील रहिवाश्यांच्या पुनर्विकासामध्ये अडचणी दूर करण्याबाबत.मुख्यमंत्री उद्वव ठाकरे  यांच्याकडे अनेक शिष्टमंडळानी विनंती केली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सदर विषयाबाबत तातडीने सखोल अभ्यास करून या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश नगरविकास प्रधान सचिव भूषण गगराणी यांना मंत्री महोदयांनी सदर बैठकीत दिले. या शिष्टमंडळात आमदार दिलीप लांडे, प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक बाळा नर,उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख सुनिल मोरे,एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे वास्तुविषारद तुषार श्रोत्री, विश्वजित भिडे, राकेश वाघेला, श्रीकृष्ण शेवडे यांचा समावेश होता.

 

टॅग्स :विमानतळमुंबईराज्य सरकार