बिर्लागेट : कल्याण तालुक्यातील बहुतांश गावात स्मशानभूमी नसल्याने उन्हाळ्यात व हिवाळ्यात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत होते. मात्र आता सुमारे २० गावात या कामासाठी जागाच मिळत नसल्याने त्यांना भर पावसाळ्यातही उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत.२०१० ते २०१५ या पाच वर्षांत कल्याण तालुक्यातील १०२ गावांना जनसुविधेमार्फत स्मशानभूमी, बोअरवेल व रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. त्यापैकी खडवली, दहिवली, दावडी, फळेगाव, गोळवली, घेसर, घोटसई, हेदूटणे, कोळे, केळणी, कोलम, खोणी, मामनोली, मानपाडा आदी ४० गावात स्मशानभूमीची कामे पूर्ण झाली आहेत. तर आणे, भिसाळे, आपटी, मांजर्ली, बापसई, बेहरे, चवरे, म्हसरोंडी, दहागाव, आडीवली, गेरसे, रेवती, मानिवली, नडगाव, निंबवली, मीस, राया, ओझर्ली, रोहण, अंताडे, आंबिवली, सांगोडा, उतने, भाराळे इत्यादी ३५ गावांतील कामे अद्याप पूर्ण नसून अर्धवट स्थिती आहेत. तर आजदे, भोपर, गोवेली, भारिवली, जांभूळ, कुंदे, माणगाव, म्हसकळ, अनखर, निळजे, मोस, सोनारपाडा, चिंचवली, वाहोली, वासुंद्री आदी २० गावात स्मशानभूमी मंजूर होऊनही जागेअभावी ती रद्द झाली. गोठेघर, वालिवली, पिंपळोली, पितांबरे नगर आणि वडवली गावात ही कामे मंजूरच झालेली नाहीत.या गावाशिवाय इतर गावात नदीकाठावर किंवा नाले, तलाव पाण्याजवळच अंत्यसंस्कार केले जातात. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात ठीक आहे. मात्र आता पावसाळ्यात अंत्यसंस्कार कसे करणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी व इतर सोई सुविधेसाठी १४ लाखांपर्यंत निधी दिला जातो. मात्र निधी मिळूनही जागा मिळत नसल्याने काही ग्रामपंचायतीचा निधी परत जाण्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. त्यामुळे मृतदेहांना स्मशानभूमीविना यातना मिळू नयेत एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. (वार्ताहर)
तालुक्यात पावसाळ्यातही उघड्यावरच अंत्यसंस्कार
By admin | Updated: June 19, 2015 00:01 IST