Join us

मुलाच्या प्रतिमेवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 11, 2015 01:18 IST

मातृदिन सर्वत्र साजरा होत असताना चिखले गावाच्या आदिवासी पाड्यावरील एका वृद्ध मातेला दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाच्या प्रतिमेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

बोर्डी : मातृदिन सर्वत्र साजरा होत असताना चिखले गावाच्या आदिवासी पाड्यावरील एका वृद्ध मातेला दोन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाच्या प्रतिमेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. हा प्रसंग बघताना अनेकांना गहिवरून आले.आदिवासी पाड्यातील रघु गोविंद कलांगडा हा दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्यातील मच्छिमार बोटीवर खलाशी कामाकरिता गेला. दीर्घकाळ लोटला तरी तो घरी परतला नाही. दरम्यान आदिवासी समाजाच्या चालीरिती प्रमाणे कुटुंबातील व्यक्तीचा अंत्यसंस्कार आणि पिंडाचा विधी केल्याशिवाय घरात लग्नकार्य पार पाडता येत नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असे गृहीत धरून कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यानुसार रविवार १० मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्याची प्रतिमा तयार करून ती वर अंत्यसंस्कार करण्यात आला. आशेपायी वाटेकडे डोळे लाऊन बसलेल्या वृद्ध आई, पत्नी आणि तीन मुली , एक मुलगा यांच्यावर आभाळ कोसळले.मातृदिन सर्वत्र साजरा झाला. मात्र अशिक्षित, वृद्ध आणि अर्धांगवायूने जर्जर झालेल्या पार्वतीला आपल्या मुलाच्या मृत्यूची कल्पना करून प्रतीकात्मक देहावर अंत्यसंस्कार करावा लागला.