नवी मुंबई : कौटुंबिक वादात बळी ठरलेल्या फ्रेन्शिलावर शनिवारी सकाळी ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचा काका क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) याने अपहरण करून तिची हत्या केली होती. शुक्रवारी घोडबंदर रस्त्यालगत झाडीमध्ये तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनानंतर शनिवारी सकाळी तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर ऐरोलीतल्या ग्रेवयार्डमध्ये तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी ऐरोली सेक्टर १० येथील चर्चमध्ये प्रार्थना करून तिचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चपासून ग्रेवयार्डपर्यंत तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी रात्री सेक्टर ८ परिसरात कँडलमार्च देखील काढण्यात आला. (प्रतिनिधी)नराधमाला कोठडी फ्रेन्शिलाच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या क्लेअरन्स फ्रान्सेका (३८) या तिच्या काकाला १३ जूनपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, फ्रेन्शिलावर शनिवारी ऐरोलीत ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिला श्रद्धांजली वाहिली.
फाशीची मागणी करणारसदर घटनेची हळहळ सर्वत्र व्यक्त होत असून आरोपीला कडक शिक्षेची मागणी होत आहे. त्यानुसार हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.