Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांपासून फरारी आरोपीला नाशिक येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बिहार राज्यातील पूर्वीच्या चम्पारण्य परिसर असलेल्या जिल्हा मोतीहारी येथून खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बिहार राज्यातील पूर्वीच्या चम्पारण्य परिसर असलेल्या जिल्हा मोतीहारी येथून खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत गेल्या १२ वर्षांपासून पसार झालेल्या कमरुद्दीन उर्फ अमीरउद्दीन अन्सारी याला नाशिक येथून गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातील सरीसवा पोलीस ठाण्यात अन्सारी याच्याविरुद्ध खंडणी मागणे, स्फोटके बाळगणे, दरोड्याची तयारी करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांमध्ये तो न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने जाहीरनामा काढून अटक वॉरंट काढले होते. त्याचा २००८ पासून बिहार पोलीस शोध घेत होते. तो मिळत नसल्यामुळे त्याच्याविरुद्धचे अनेक खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी बिहार पोलिसांनी ठाणे पोलिसांना विनंती केली होती. तो नाशिक येथील सिडको कॉलनीतील पंडितनगर येथे असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १च्या पथकाला मिळाली. त्या आधारे नाशिकच्या अंबड पोलिसांच्या मदतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्सारी याला ३१ डिसेंबर रोजी या पथकाने ताब्यात घेतले. त्याला लवकरच बिहारच्या सरीसवा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.