Join us

अनधिकृत पार्र्किंग ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: September 11, 2015 01:24 IST

पनवेल शहरासह, शहरामधून जाणाऱ्या महामार्गावरील अनधिकृत पार्किंग रहिवाशांची डोकेदुखी ठरत आहे. खांदा वसाहत, नवीन पनवेलसह कामोठे, खारघर आदी ठिकाणच्या अनधिकृत

- वैभव गायकर,  पनवेलपनवेल शहरासह, शहरामधून जाणाऱ्या महामार्गावरील अनधिकृत पार्किंग रहिवाशांची डोकेदुखी ठरत आहे. खांदा वसाहत, नवीन पनवेलसह कामोठे, खारघर आदी ठिकाणच्या अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. पनवेल शहरामधून मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहनांची ये-जा सुरु असते. रात्रीच्या वेळी वाहनचालक मिळेल त्या जागी वाहने उभे करतात. कळंबोली पोलाद मार्केट, आसुडगाव, खांदा वसाहत, सीकेटी महाविद्यालय, नवीन पनवेल शहराच्या काही भागात चालकांकडून सर्रास अवजड वाहनांचे पार्र्किं ग केले जाते. याच ठिकाणी स्टोव्हवर जेवण तयार केले जाते. अनेकदा कंटेनर्समध्ये ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. भर रस्त्यात अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने शहरात अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. लोकवस्तीच्या ठिकाणी वाहनांच्या कर्कश आवाजामुळेही रहिवाशांची डोकेदुखी वाढत आहे. अनेक ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेशास मनाई आहे. मात्र तरीही ही वाहने लोकवस्तीत येत असून त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खारघर शहरामध्ये पार्किंगला शिस्त लागावी म्हणून सम-विषम पार्किंगचा नियम करण्यात आला आहे. मात्र खारघर वाहतूक शाखेमार्फत अनधिकृत पार्किंग करणाऱ्या गाड्यांवर कारवाई क रणारी क्रेन बंद आहे. कारवाई होत नसल्याने अनधिकृतपणे वाहन पार्क करणाऱ्या चालक बेधडकपणे कुठेही वाहने पार्क करताना दिसतात. शहरातील वाहतूक शाखेच्या जवळच लिटील वर्ल्ड मॉल परिसरातही अनेक वाहने रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी उद्भवते. कळंबोली - मुंब्रा मार्गावर पोलाद मार्केटजवळील सिग्नल यंत्रणेजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केलेले सहज नजरेस पडते. तसेच सायन-पनवेल महामार्गावर कोपरा गावाजवळ देखील अशाप्रकारची अनधिकृत पार्किंग केली जात आहे. अशा प्रकारे अनधिकृत वाहन पार्किंग करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांची भीती राहिली नसल्यामुळे दिवसेंदिवस शहराला अनधिकृत पार्किंगचा विळखा वाढत चालला आहे. बेकायदेशीर वाहन पार्किंग करणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरु केली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करुन अशाप्रकारे बेकायदेशीर वाहन पार्क करणाऱ्यांवर लगाम घातला जाईल. - दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा