Join us

वंचित बहुजन आघाडीचा अदानीच्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:18 IST

अदानी जाणीवपूर्वक सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांना जास्त वीजबिल पाठवत आहे

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टिळकनगर येथील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. दुपारी दोन वाजता अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी करण्यात आली. वार्षिक उत्पन्न दोन लाख असणाऱ्या व्यक्तीला २०० युनिट वीज मोफत द्या, जबरदस्तीने आकारण्यात येणारी अनामत रक्कम घेणे रद्द करा, जुने मीटर बदलताना नव्या मीटरचे पैसे ग्राहकांकडून घेऊ नये, शॉर्टसर्किट झाल्यास नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अदानी जाणीवपूर्वक सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांना जास्त वीजबिल पाठवत आहे. विकासकाने थकविलेले वीज बिलाचे पैसे नागरिकांकडून वसूल केले जात आहेत. अनेक रहिवाशांना १५ ते १८ हजार वीज बिल पाठविले जात आहे. घरचे उत्पन्न १० ते १२ हजार असताना एवढे वीजबिल कसे भरणार, असा सवाल या वेळी सिद्धार्थ कॉलनीमधील नागरिकांनी उपस्थित केला. या मोर्चाचे नेतृत्व रेखा ठाकूर, डॉ. ए.डी. सावंत, धनराज वंजारी यांनी केले. 

टॅग्स :मुंबई