Join us  

एसटीला मालवाहतुकीचा आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 8:16 PM

एसटीची मालवाहतूक मागील महिन्यापासून एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात एसटीचे प्रवासी उत्पन्न बंद झाले. त्यामुळे आधीच डबघाईला आलेली एसटी सेवा लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडली आहे. मात्र एसटीने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे एसटीला माल  वाहतुकीचा आधार मिळाला आहे.  

एसटीची मालवाहतूक मागील महिन्यापासून एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  राज्य सरकारने   १८ मे  रोजी मालवाहतूक बसचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे, अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एस.टीमधून केली जात आहे.

नुकताच विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकऱ्यांसह एसटीने दिमाखात पंढरी नगरीमध्ये गेल्या. देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव, नेवासा येथून संत मुक्ताई , त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पंढरपुरातुन संत नामदेव यांच्या पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही,लालपरी अशा विविध बसमधून  निवडक वारकरी बंधूंसह  पंढरपूरकडे गेल्या.

मुंबई महानगरात राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळ लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून सेवा देत आहे. दररोज १२ ते १४ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करतात. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस