नवी मुंबई : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये ३ कोटींचा अपहार झाल्याची तक्रार सीबीडी पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. लाभार्थीपर्यंत पेन्शन पोहचते की नाही याचा अहवाल मागवूनही तो सादर न केल्याने एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.दिल्ली येथील गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र सैनिक विभागाकडून ही तक्रार दाखल झाली आहे. या विभागाकडून जुलै २०१४ पासून आजपर्यंत सीबीडी येथील एसबीआय बँकेकडे स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनचे सुमारे ३ कोटी रुपये जमा केले होते. मात्र ही रक्कम स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत पोहचली की नाही अथवा सद्यस्थितीला किती लाभार्थी हयात आहेत, याचा अहवाल सदर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून केंद्राकडे सादर झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनच्या रकमेत अपहाराची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये अपहार?
By admin | Updated: February 12, 2015 01:06 IST