Join us

स्वातंत्र्यसेनानी, माजी सैनिकांचा सन्मान

By admin | Updated: August 13, 2014 01:46 IST

स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांचा पनवेल काँग्रेसच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.

पनवेल : स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि माजी सैनिकांचा पनवेल काँग्रेसच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सर्व मान्यवर भारावून गेले. त्याचबरोबर या माध्यमातून देशप्रेमाचा एकप्रकारे जागर करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी अनेक चळवळी आणि आंदोेलने केली. त्याचबरोबर स्वातंत्र्यसंग्राम उभा केला. देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतावर चीन आणि पाकिस्तानकडून आक्रमण करण्यात आले. हे हल्ले भारतीय सैनिकांनी यशस्वीपणे परतवून लावले. त्यामध्ये कित्येकांना वीर मरण आले. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. त्याचे साक्षीदार असलेले अनेक माजी सैनिक पनवेलमध्ये आहेत. या सर्वांचा उचित सन्मान झाला पाहिजे, हा विचार घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय चौपाने, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष आर.सी घरत, कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा चारूशीला घरत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, क्रांतीकारकांचा इतिहास आणि देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांची वीरगाथा तरुण पिढीला सांगण्याची आज गरज आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्य आणि देशासाठी झटणाऱ्यांचा सन्मान करून एक वेगळा वस्तुपाठ समाजासमोर ठेवल्याचे मत शिवाजी देशमुख यांनी व्यक्त केले. तर ब्रिटिशांना हा देश सोडण्यास भाग पाडणाऱ्या स्वतंत्र्यसैनिकांनी एक क्रांती घडून आणली. त्याकरीता त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. अशा देशभक्तांचे स्मरण होण्याची गरज असल्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. आज अंधश्रध्दा निर्मूलन, स्त्रियांचा सन्मान, आत्महत्यामुक्त भारत, एड्स नियंत्रण या सामाजिक विषयांवर खऱ्या अर्थाने क्रांती होणे आवश्यक आहे. याकरीता सर्वांनी एक पाऊल पुढे टाकीत हा संकल्प करावा असे आवाहन ठाकूर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबिय आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)