Join us

भिनारमध्ये मोफत शिकवणी वर्ग

By admin | Updated: May 6, 2015 01:33 IST

ग्रामीण भागातून ९वी उत्तीर्ण होऊन १०वीत गेलेल्या अनुसूचित जाती व जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाणे जिल्हा परिषदेने मोफत शिकवणी वर्ग सुरू केले.

सुरेश लोखंडे, ठाणे ग्रामीण भागातून नववी उत्तीर्ण होऊन दहावीत गेलेल्या अनुसूचित जाती व जमातींचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण व्हावेत, यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाणे जिल्हा परिषदेने मोफत शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. भिवंडी तालुक्यातील भिनार आश्रम शाळेत सुरू झालेल्या या वर्गांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह निवास व भोजन व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राज्यात प्रथमच हा नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात येत आहे. सुमारे १३ जूनपर्यंत म्हणजे तब्बल ४० दिवस सुरू राहणाऱ्या या वर्गासाठी येण्यास इच्छुक असलेल्यांनी जिल्हा समाजकल्याण कार्यालय किंवा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण अधिकारी. बी. ए. शिंदे यांनी केले.आहे. सुमारे २२५ विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या क्लासेसला सध्या ५० विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. कोचिंग क्लासच्या धर्तीवर आयोजित केलेल्या या वर्गामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि भूमितीचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांंची गुणवत्ता वाढून त्यांना उच्चदर्जाच्या अभ्यासक्रमास सहज प्रवेश मिळणे शक्य होणार असल्याची अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे. दहावीत प्रवेश घेणाऱ्या शहरी भागातील विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसमधून शिक्षण मिळते. मात्र, आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना क्लासेस उपलब्ध होत नाही. या वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने विषयातील खास तज्ज्ञ शिक्षकांवर या वर्गाची जबाबदारी आहे.