प्रस्ताव अंतिम टप्प्यात : कार्यवाही करण्याचे महापाैरांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर दिव्यांगांना विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.
३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग विकास दिनानिमित्त किशोरी पेडणेकर यांनी दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या मागण्या रास्त असून त्यांचे प्रलंबित विषय व समस्या महापालिका प्रशासनाने तातडीने निकाली काढाव्यात. दिव्यांगांना यूडी आयडी कार्ड एका दिवसात मिळणे ही मागणी रास्त असून याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. सोबतच उपनगरातील महापालिका रुग्णालयात यूडी आयडी कार्ड काढण्याची व्यवस्था सुरू करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. दिव्यांगांना आपल्या स्टॉलचे भाडे ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.