Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत एक लाखाहून अधिक नागरिकांच्या मोफत कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या नि:शुल्क कोरोना चाचणी केंद्रांत आतापर्यंत सुमारे एक लाखाहून अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या नि:शुल्क कोरोना चाचणी केंद्रांत आतापर्यंत सुमारे एक लाखाहून अधिक लोकांनी चाचणी केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने शहर, उपनगरात २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर जलद चाचणी केली जात आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी कोरोनाची चाचणी मोफत करून घेतली आहे. या तपासणीत केवळ दोन टक्के लोकांना कोराेनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे अशा रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. सध्या मुंबईत कोराेनाची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अन्य राज्यांतून मुंबईत येणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. याशिवाय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

* मुुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे १ हजार ९२ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ५७२ इतकी झाली आहे. शनिवारी १ हजार ५३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ५१ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १२ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २८० दिवसांवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३१० दिवसांवर होता, त्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. १४ ते २० नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरात आतापर्यंत कोरोनाच्या १७ लाख ५७ हजार ६६६ चाचण्या झाल्या आहेत.