Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मोफत बायो शौचालय

By admin | Updated: June 20, 2015 23:21 IST

स्वच्छ भारत अभियनाच्या धर्तीवर आता ठाणे महापालिकेने स्वच्छ शहर मोहीमेला हातभार लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून शौचालय

ठाणे : स्वच्छ भारत अभियनाच्या धर्तीवर आता ठाणे महापालिकेने स्वच्छ शहर मोहीमेला हातभार लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून शौचालय नसणाऱ्या प्रत्येक ठाणेकरांना आता यापुढे ‘बायो शौचालया’ची मोफत सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.ठाणे महापालिका हद्दीत सार्वजनिक शौचालये आहेत, तसेच काहींनी आपल्या घरीही शौचालये उभारली आहेत. परंतु, आजही काही भागात म्हणजेच घोडबंदरच्या काही ठिकाणांसह वागळे इस्टेट, इंदिरानगर, कळव्यातील पारसिक हील, मुंब्रा आदी भागात आजही उघड्यावर प्रातर्विधी उरकला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छताच्या मोहीमांचे यामुळे बारा वाजले आहेत. परंतु, आता स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने ही मोहीम जोरदारपणे शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील एकही नागरीक प्रातर्विधीकरीता उघड्यावर बसू नये म्हणून शौचालय नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला ते पुरविले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार चार हजार आणि राज्य सरकार आठ हजार असे १२ हजारांचे अनुदान देणार आहे. ज्यांना घरात शौचालयाकरीता जागा नसेल त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गृह या योजनेतून उभारले जाणार आहेत. त्यासाठीसुद्धा राज्य आणि केंद्राकडून अनुदान देणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. याशिवाय प्रत्येक नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातील शौचालय नसणाऱ्यांची यादी महापालिकेकडे दिल्यास त्यानुसार अनुदानाची मागणी करणे सोपे होईल, असेही ते म्हणाले. ही शौचालये इको फ्रेंडली असावीत, असा पालिकेचा विचार असून काही संस्थेंबरोबर या संदर्भात बोलणी सुरु असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. तसेच शहरातील काही भागात महिलांसाठीदेखील स्वतंत्र शौचालये उभारली जाणार आहेत. तर झोपडपट्टी भागातील शौचालयांची देखभाल पालिका करणार आहे. मात्र, या भागात आजही मलनि:सारण वाहिन्या टाकल्या नसल्याने त्या संदर्भात नगरसेवकांबरोबर चर्चा करुन पुढील धोरण ठरविले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)