गौरी टेंबकर - मुंबईलॉटरी, नोकरी लागली असे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामटयांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. असेच एक प्रकरण मालवणीत उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेंतर्गत लागलेल्या लॉटरीचे १४ लाख बँकेत जमा करण्यासाठी मोबाईल रिचार्ज करावे लागतील, असे सांगून एका विवाहितेला ३५ हजारांना फसविले. परवीन असिफ खान (२४) असे या महिलेचे नाव असुन ती मालवणीच्या म्हाडा वसाहतीत राहते. परवीनने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार १२ मार्चला तिला एका क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने ‘आपको प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के तरफ से १४ लाख रुपयो का इनाम लगा है. ये पैसे पाने के लिये आपको ३५ हजार रुपये का मोबाईल रिचार्ज भरना पडेगा, पैसे भरने के बाद आधे घंटे मे आपके बँक खाते मे १४ लाख की राशी जमा हो जायेगी’, असे आमीष दाखवले. मला ही बाब खरी वाटली आणि मी घराजवळ असलेल्या मोबाईलच्या दुकानात जाऊन फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या १६ मोबाईल क्रमांकावर वेगेवेगळ्या रकमेच्या स्वरूपात ३५ हजार रुपये भरले. इतकी मोठी रक्कम नसल्याने दुकानदाराकडून उधारीवर रिचार्ज केले, परवीन सांगत होती.बँकेत पैसे जमा झाले की माझ्या मोबाईलवर मेसेज येईल आणि मी रिचार्जवाल्याचे पैसे देऊन टाकेन, असे मी ठरवले होते. मात्र तसे काहीच झाले नाही. पैशांसाठी मोबाईल रिचार्जवाला माझ्याशी हुज्जत घालू लागल्याने मी घरी येऊन घडला प्रकार सासरे जावेद खान यांना सांगितला. तेव्हा त्यांनी कसेबसे ३५ हजार रुपये जमवले आणि दुकानदाराला दिले. मात्र या फसवणुकीच्या प्रकारामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला असुन त्यांना उपचारार्थ अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खान यांनी सांगितले. तक्रारच दाखल केली नाही फसवणुकीची तक्रार करण्यासाठी जेव्हा खान मालवणी पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा पोलिसांनी त्यांची तक्रार दाखलच करून घेतली नाही. याउलट या क्रमांकाविरोधात यापूर्वी अशा ५० तक्रारी आल्या आहेत. हा फसवणुकीचा गुन्हा आहे, असे त्यांना सांगत त्यांना टाळण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिस म्हणतात...खान यांच्या सोबत झालेल्या फसवणुकीबाबत मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना विचारले असता, ‘माझाकडे अद्याप अशा प्रकारची तक्रार आलेली नाही, त्यामुळे खान यांनी मला येऊन भेटावे. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मी याप्रकरणी योग्य ती कारवाई करेन’, असे त्यांनी सांगितले.