Join us

मुद्रा कर्ज योजनेच्या नावाखाली फसवणूक; महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:42 IST

उद्योगधंद्यासाठी सरकारी मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत शेकडो महिलांकडून रक्कम उकळल्याच्या आरोपावरून बोरीवली पोलिसांनी श्वेयमजिता गोरक्ष या महिलेला अटक केली.

मुंबई : उद्योगधंद्यासाठी सरकारी मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत शेकडो महिलांकडून रक्कम उकळल्याच्या आरोपावरून बोरीवली पोलिसांनी श्वेयमजिता गोरक्ष या महिलेला अटक केली. तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.गोराई २ येथील अजिंक्यतारा सोसायटीत राहाणाऱ्या या महिलेने गेल्या वर्षभरापासून अनेक महिलांना सरकारी योजनेतून प्रत्येकी २ लाख रूपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. कर्ज मिळवून देण्यासाठी ४0 हजार रूपये खर्च येईल. कर्जातील रकमेतून ती रक्कम कापून उर्वरीत १ लाख ६0 हजार रूपये अर्जदाराला दिले जातील तसेच ६0 हजार रूपये अनुदान मिळेल, असे गोरक्ष हिने गरजू महिलांना सांगितले होते. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून अर्ज आणि कागदपत्रे तसेच तीन हजार रूपये तिने घेतले होते. मात्र प्रत्यक्षात कुणालाही कर्ज मिळवून दिले नाही, अशी तक्रार आहे.या घोटाळ््याची माहिती मिळताच भाजपा महिला मोर्चाच्या बोरीवली विधानसभा उपाध्यक्षा रेश्मा निवळे, जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली. अशा आरोपींमुळे सरकारी योजनाही नाहक बदनाम होत असल्याची दखल घेऊन खासदार गोपाळ शेट्टी यांनीही पोलिसांना सूचना दिल्या. अखेरीस चौकशीअंती आरोपी गोरक्ष हिला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी अनेक आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.