Join us

चौदा वर्षीय मुलीवर दोन वर्षे बलात्कार

By admin | Updated: November 24, 2015 02:09 IST

गेल्या दोन वर्षांपासून सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या चाळीस वर्षीय इसमाला एमएचबी पोलिसांनी रविवारी अटक केली.

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या चाळीस वर्षीय इसमाला एमएचबी पोलिसांनी रविवारी अटक केली. मुख्य म्हणजे या मुलीच्या आईला याबाबत सर्व काही माहीत असूनही तिने कुणाला काहीच सांगितले नाही. आता या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दहिसर परिसरात हा इसम राहत असून, त्याने दोन वर्षांपूर्वी एका विधवा महिलेसोबत विवाह केला. त्यानंतर तो या महिलेच्या मुलीचा लैंगिक छळ करू लागला. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर मुलीने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यांनी एमएचबी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेत रविवारी दिंडोशी सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस सुभाष चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)तक्रार मागे घ्यायची आहे... वडिलांविरोधात तक्रार दाखल झाली; तेव्हा पोलीस त्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी गेले. मात्र आम्हाला तक्रार मागे घ्यायची आहे, असे पीडित मुलगी आणि आईने पोलिसांना सांगितले. उपजीविकेचे दुसरे काहीच साधन मायलेकींकडे उपलब्ध नसल्याने हा आरोपी त्यांचा खर्च चालवत होता. परिणामी त्याला अटक झाली तर कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे त्यांनी तक्रार मागे घेण्याचे ठरविल्याचे सूत्रांनी सांगितले.