Join us

मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत

By admin | Updated: September 24, 2014 23:28 IST

नुकत्याच संपन्न होणाऱ्या अलिबाग - मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

नांदगाव : नुकत्याच संपन्न होणाऱ्या अलिबाग - मुरुड विधानसभा क्षेत्रात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद प्रतोद महेंद्र दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद न मिळाल्याने ते आता शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकी लढणार आहेत. तर या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अलिप्त राहून काँग्रेस पक्षाला सहकार्य करेल असा सर्वांचा कयास होता. परंतु आता तसे घडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मंगेश दांडेकर यांना आजच सकाळी आमदार सुनील तटकरे यांच्या भ्रमणध्वनीवरुन कामास सुरुवात करण्याचे आदेश आल्याने ते सुध्दा या निवडणुकीत रंग भरणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीची युती महाराष्ट्रात अद्याप होत नाही. त्यांच्या जागेचा तिढा अद्याप कायम असल्याने या मतदार संघात फॉर्म भरुन सजगता दाखवण्याचे औदार्य राष्ट्रवादी पार्टीने दाखवले आहे. दांडेकर यांचे समर्थक खूप आनंदी झाले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी यांची युती होणार की नाही याबाबत आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच कदाचित पूर्व तयारीसाठी तटकरे यांनी फोन केला असावा. याबाबत दांडेकर यांना विचारणा केली असता राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाची आघाडी न झाल्यास तेव्हाच आपण फॉर्म भरु शकणार आहेत. तटकरे यांचा आदेश आला तरच फॉर्म भरु असे त्यांनी सांगितले.हा सर्व घोळ सुरु असून शेतकरी कामगार पक्षाने प्रथमपासून उमेदवारी पंडीत पाटील यांना घोषित करुन ते प्रचारात मग्न झाले आहेत. इतर पक्षांची अधिकृत उमेदवारांची नावे घोषित न झाल्याने प्रचाराला वेग घेतलेला नाही. लवकरच येत्या २६ व २७ सप्टेंबरला शेकाप उमेदवार पंडीत पाटील व काँग्रेस आय उमेदवार मधुशेठ ठाकूर आपले उमेदवारी फॉर्म दाखल करणार आहेत. या मतदार संघात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. फॉर्म दाखल केल्यावरच प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. सध्या उमेदवार घरा-घरात प्रचार करण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत, अजून ही कोणत्याही उमेदवाराची जाहीर प्रचार सभा झालेली नाही. प्रत्येक पक्ष आपले मतदाते फुटू नये याची फार काळजी घेताना दिसत आहेत. चारचाकी गाडीतून फिरणारे नेते आता जमिनीवर अवतरले असून पायी चालत गावागावात भेटी घेताना दिसतआहेत. (वार्ताहर)