Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरवर गोळीबार करणारे चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 03:02 IST

बांधकामाचे कंत्राट आपल्याला न दिल्याने, चुनाभट्टी येथे विकासकाच्या मुलावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून उघड झाली आ

मुंबई: बांधकामाचे कंत्राट आपल्याला न दिल्याने, चुनाभट्टी येथे विकासकाच्या मुलावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह चार जणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सुमीत उर्फ पप्पू येरुणकर, अजय कारोसी, विनोद विश्वकर्मा उर्फ रेमो व बाबूकुमार गुप्ता अशी त्यांची नावे आहेत. चुनाभट्टीतील सायन-ट्रॉम्बे रोडवरील अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन यांच्यावर ५ फेबु्रवारीला दोन बुरखाधारी पुरुषांनी गोळीबार केला होता. गुन्हे अन्वेषण शाखेचे कक्ष-५ कडून सुरू असलेल्या तपासात पप्पू येरुणकरचे नाव समोर आले. तो पूर्वी डी. के. रावच्या टोळीत कार्यरत होता. त्यानंतर, त्याने स्वत:ची टोळी बनवून व्यावसायिकांकडून खंडणी वसुली केली होती. जैन यांचे चुनाभट्टी येथे सुरू होत असलेल्या १९ मजली इमारतीचे बांधकाम मटेरियलचे कंत्राट मिळावे, म्हणून भेट घेतली होती. या भेटीमध्ये जैन यांनी त्याला होकारही दिला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी जैन यांनी कंत्राट देण्यास नकार दिल्याने, त्यांच्या चुनाभट्टी येथील कार्यालयावर पाळत ठेवली. यामध्ये त्याने पप्पू येरुणकर आणि स्थानिक रहिवासी विनोद विश्वकर्मा उर्फ रेमो आणि बाबूकुमार गुप्ता यांची मदत घेतली. दोघांनाही ५ लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरल्याने त्यांनी या कामाला होकार दिला. घटनेच्या १० दिवसांपूर्वीच येरुणकरने जैन यांचे कार्यालय असलेल्या इमारतीत कारोसी आणि गुप्ता यांनी भाड्याने खोली घेतली. या गुन्ह्यांसाठी दोन गाड्याही मित्राकडून घेतल्या होत्या. ३ आणि ४ फेब्रुवारीला गोळीबार करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर, अखेर ५ फेब्रुवारी रोजी जैन यांचा मुलगा मित्रांसोबत कार्यालयात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, त्यांनी जैन यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडून पळ काढला. दरम्यान, बाहेर गाडी घेऊन उभ्या असलेल्या गुप्तासह गाडीमध्ये बसून दोघांनी पळ काढल्याची माहिती तपासात समोर आली. कल्याण येथे यातील तिघेजण येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनय वस्त आणि मोटारवाहन चोरीविरोधी कक्षाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, कल्याण येथे सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ या टोळीचा म्होरक्या येरुणकरच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)