Join us

मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे चार रुग्ण

By admin | Updated: February 5, 2015 02:58 IST

स्वाइन फ्लूने मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : स्वाइन फ्लूने मुंबईत शिरकाव केला असून फेब्रुवारी महिन्यात या तापाचे चार रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. तर चौथा रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत असल्याचे साथ रोग नियंत्रणाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले . सांताक्रूझ येथील नऊ वर्षीय मुलगी, वांद्रे येथील ५५ वर्षीय महिला, माहिम येथील ५४ वर्षीय महिला आणि मुलुंड येथील ६५ पुरुष यांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. ६५ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तीन रुग्णांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ््या सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पालघर येथील एका रुग्णाचा होली स्पिरीट रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली. मुंबईतील सर्व रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू विषयी परिपत्रक पाठवण्यात आले आहे.एखाद्या रुग्णात लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कस्तुरबा रुग्णालयात यासाठी एक वॉर्ड सज्ज आहे, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले. जसलोकमध्ये स्वाइन फ्ल्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी एक रायपूरचा तर दुसरा खारघरचा असल्याची माहिती डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिली. (प्रतिनिधी) घसा दुखणे, घसा खवखवणे, डोके दुखी, ताप अशी लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. ही स्वाईन फ्ल्यूची ही लक्षणे आहेत. लवकर उपचार घेतल्यास स्वाईन फ्ल्यू लवकर बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.