Join us

एकाच दिवसात ठाण्यात मंगळसूत्र चोरीच्या चार घटना

By admin | Updated: January 16, 2015 22:52 IST

मंगळसूत्र जबरी चोरीचे सत्र शहरात सुरूच असून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवूनही १५ जानेवारी रोजी एकाच दिवसात चार घटना घडल्या आहेत

ठाणे : मंगळसूत्र जबरी चोरीचे सत्र शहरात सुरूच असून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवूनही १५ जानेवारी रोजी एकाच दिवसात चार घटना घडल्या आहेत. यात चार महिलांकडून पावणेतीन लाखांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्यात आली आहे.सावरकरनगर भागातील रहिवासी श्वेता सावंत या १५ जानेवारी रोजी सकाळी ८.१५ वा.च्या सुमारास रजपूत ड्रायव्हिंग सेंटरसमोरील रस्त्याने रिक्षा पकडण्यासाठी जात होत्या. त्याच वेळी समोरून आलेल्या मोटारसायकलस्वाराने त्यांचे एक लाख ५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक गोळे हे अधिक तपास करीत आहेत. दुसरा प्रकार वागळे इस्टेट परिसरातील परमार्थ निकेतन आणि आशर इस्टेट बिल्डिंगच्या मधील रस्त्यावर घडला. नम्रता कदम सकाळी ८.२० वा.च्यादरम्यान येथून कलावतीआई मंदिराबाहेरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्याने त्यांची १५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक काकडे हे पुढील तपास करीत आहेत. तिसरा प्रकार दुपारी १.१५ वा.च्या सुमारास एलबीएस मार्गावरील शंकर मंदिरासमोरील रस्त्यावर घडला. या मार्गावरून जाणाऱ्या कुसुम माने यांच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजारांचा सोन्याचा हार आणि २० हजारांचे मंगळसूत्र असा एक लाख १० हजारांचा ऐवज चोरट्याने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर हे या चोरीचा तपास करीत आहेत. याचदरम्यान, दुपारी १.१५ वा.च्या सुमारास कविता बोरकर यांचेही मंगळसूत्र लुबाडण्यात आले. त्या हनुमान मंदिरातून गांधीनगर येथील त्यांच्या घरी जात असताना समोरून मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने त्यांचे ६० हजारांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, २० हजारांची सोनसाखळी आणि २० हजारांचे मणीमंगळसूत्र असा एक लाखांचा ऐवज हिसकावून पोबारा केला. (प्रतिनिधी)