Join us

चार सराईत सोनसाखळी चोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या ऋतिक सीताफराव ऊर्फ भाई (१९, रा. कोपरी, ठाणे), ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या ऋतिक सीताफराव ऊर्फ भाई (१९, रा. कोपरी, ठाणे), प्रतीक सीताफराव ऊर्फ भावड्या (२१, रा. कोपरी, ठाणे), वैभव प्रकाश गवळी ऊर्फ बच्ची (२६, रा. अंबरनाथ) आणि राकेश प्रेमचंद गुरुदासानी ऊर्फ राक्या (२६, रा. कशेळी, भिवंडी) या चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांमधील चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नौपाडा परिसरामध्ये लॉकडाऊनच्या काळात एका सोनसाखळीच्या जबरी चोरीची घटना घडली होती. अनलॉकनंतरही दोन जबरी चोरीच्या घटना नोंद झाल्या. या घटनांचा तपास करून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. त्याच वेळी सोनसाखळी जबरी चोरीतील दोघे जण ठाण्याच्या ब्रह्मांड भागात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ३० नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या ब्रह्मांड भागातून ऋतिक आणि प्रतीक या दोघांना उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक सुनील राठोड, संजय चव्हाण आणि गोरखनाथ राठोड यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांचा तिसरा साथीदार वैभव यालाही त्याच दिवशी ताब्यात घेतले. त्यापाठोपाठ राकेशला १ डिसेंबर रोजी अटक केली.

चौकशीत आठ गुन्हे उघड

चौकशीत त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी चोरी, सोनसाखळी चोरीच्या तीन आणि एका ठिकाणी मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्याचबरोबर त्यांनी नौपाडा आणि विरार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आतापर्यंत आठ गुन्हे उघड झाले असून, ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटरसायकली आणि ११ हजारांची रोकड असा चार लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.