मुंबई : या आठवड्यात असलेले बँक हॉलिडे आणि आठवड्यातील सुटी घेऊन सलग चार दिवस ‘वीकेण्ड धमाका’च मुंबईकरांना मिळत आहे. सलग सुट्या घेऊन मौजमजेसाठी मुंबईकरांनी बाहेरचा रस्ता धरला असून यासाठी वाटेल ती किंमत मोजली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांना एप्रिल महिन्यात बऱ्याच सुट्या मिळत असून एकप्रकारे चंगळच झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून याची सुरुवात झाली आहे. २ एप्रिल रोजी महावीर जयंती, ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असून या बँक हॉलिडेला लागूनच एक शनिवार येत आहे. ही शनिवारची सुटी घेऊन आणि त्यानंतर असलेला रविवार असे २ एप्रिल ते ५ एप्रिल सलग चार दिवस सुट्या घेऊन मुंबईकरांनी मौजमजेसाठी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. यासाठी खासकरून काही पर्यटनस्थळांना त्यांनी पसंतीही दिली आहे. यामध्ये देवदर्शन, निसर्गरम्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. राज्यातील ताडोबा जंगल, तसेच अष्टविनायक दर्शन, पुण्यातील काही पर्यटनस्थळे आणि अन्य ठिकाणे आघाडीवर आहेत. तर गोव्यालाही पसंती देतानाच महाराष्ट्राबाहेरील दिल्ली, राजस्थान आणि भारताबाहेरील दुबई, सिंगापूरला पसंती दिण्यात आली आहे. चार दिवस सुटी असल्याने आणि मोठ्या प्रमाणात राज्यात पर्यटकांचा वावर वाढणार असल्याने खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात वाढ केली आहे. गोवा, कोल्हापूर, पुणे या मार्गावर तर खासगी बस मालकांनी नेहमीच्या दरांपेक्षा २00 ते ३00 रुपये तिकिटांत वाढ केल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईकरांचा चार दिवस ‘वीकेण्ड धमाका’
By admin | Updated: April 1, 2015 00:46 IST