Join us

चौघांच्या जामीन अर्जावर चार दिवस सुनावणी

By admin | Updated: February 13, 2016 02:38 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ‘त्या’ चार नगरसेवकांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्याचा निर्णय शुक्रवारी ठाणे न्यायालयाने

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ‘त्या’ चार नगरसेवकांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्याचा निर्णय शुक्रवारी ठाणे न्यायालयाने घेतला आहे. त्यानुसार, १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान त्यांचे जामीन अर्ज सुनावणीस येतील. शुक्रवारी नजीब मुल्ला यांच्या जामीन अर्जावर सुरू असलेल्या सुनावणीला सरकारी वकील अनुपस्थित राहिल्याने ही सुनावणी येत्या सोमवारी १५ फेब्रुवारी होणार आहे. परमार आत्महत्येप्रकरणी नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, माजी हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण हे चौघे न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीनासाठी त्यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले आहेत. त्यापैकी मुल्ला यांच्या अर्जावरील सुनावणीला ४ फेब्रुवारीला सुरुवात झाली. त्या वेळी सरकारी वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितल्याने आजही सुनावणी झाली. मागील तारखेला मुल्ला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील राजा ठाकरे हे उच्च न्यायालयातील अतिरिक्त कामात व्यस्त असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे ही सुनावणी येत्या सोमवारी १५ फेब्रुवारीला होणार आहे. याचदरम्यान, न्यायमूर्ती व्ही.व्ही. बांबर्डे यांनी उर्वरित तीन नगरसेवकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्वतंत्रपणे घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार, नजीब यांच्या अर्जावर १५ फेब्रुवारीला सुनावणी झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला हणमंत जगदाळे, २० फेब्रुवारीला सुधाकर चव्हाण आणि २२ फेब्रुवारीला विक्रांत चव्हाण यांची सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)