Join us

चालकावर खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

By admin | Updated: April 17, 2017 03:10 IST

कारमध्ये प्रवासी म्हणून बसणाऱ्या, त्यानंतर चालकास मारहाण करून कारसह साडेसहा लाखांचा ऐवज लुबाडणाऱ्या अक्षय ऊर्फ चिन्मय उगवेकर (२३)

ठाणे : कारमध्ये प्रवासी म्हणून बसणाऱ्या, त्यानंतर चालकास मारहाण करून कारसह साडेसहा लाखांचा ऐवज लुबाडणाऱ्या अक्षय ऊर्फ चिन्मय उगवेकर (२३), अर्जुन तिवारी (२०), राजकुमार डोळे (१९) आणि मोनू ऊर्फ विशाल सरोज (१९) या चौघांना रविवारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाइलही पोलिसांनी हस्तगत केले.माजिवडा सेवा रस्त्यावर १ एप्रिल रोजी मध्यरात्री विमलेशकुमार गुप्ता हे गाडी पार्क करून लोढा इमारतीसमोर जेवण करत होते. जेवणानंतर ते निघाले असतानाच या चौघांनीही मुंब्रा येथे जायचे असल्याचे सांगितले. या भाड्यासाठी नकार देताच त्यांनी त्याला मारहाण केली. त्यांच्या कारची चावी हिसकावून त्यांना सीटखाली कोंबून बसवले. त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून कार नाशिकच्या दिशेने नेली. त्यांच्याकडून दोन मोबाइल, पाच हजारांची रोकड आणि एटीएमकार्ड असा सहा लाख १५ हजारांचा ऐवज हिसकावला. ‘याला मारून इथेच फेकून देऊ’ असेही त्यांचे बोलणे सुरू असतानाच कसारा घाटात कारचा वेग मंदावल्यानंतर गुप्ताने कारमधून उडी घेतली. नंतर, इगतपुरी पोलिसांनी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ४ एप्रिल रोजी हे प्रकरण कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग झाले. याच टोळक्याची माहिती एका खबऱ्याकडून कापूरबावडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे यांना मिळाल्यानंतर या चौघांनाही बाळकुम भागातून पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)