Join us  

बनावट गरबा पासच्या विक्रीप्रकरणी चौघांना अटक; वेब सिरीज पाहून आराेपींना सुचली युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:44 AM

दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरीवली आणि स्थानिक आमदार प्रस्तुत ‘रंगरात्री दांडिया नाइट्स सीझन २ विथ किंजल दवे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खासगी गरब्याच्या बनावट पासची विक्री करत आयोजकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना १२ तासांत अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दोन पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. वेब सिरीज पाहून ही युक्ती सुचल्याचे मुख्य आरोपीने एमएचबी कॉलनी पोलिसांना सांगितले. 

दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरीवली आणि स्थानिक आमदार प्रस्तुत ‘रंगरात्री दांडिया नाइट्स सीझन २ विथ किंजल दवे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच्या प्रवेशिकांची विक्री ही कच्छी मैदानावर असलेल्या एकाच स्टॉलवरून, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून सुरू आहे. मात्र काही तरुणांनी त्यांना मिळालेल्या प्रवेशिका बनावट असल्याची तक्रार आयोजक नीरव मेहता (३२) यांना केली. कॉलेजमधील मित्र करण शहा याने दर्शन गोहिल नामक व्यक्तीकडून घेऊन प्रत्येकी ३ हजार रुपयांना १० प्रवेशिका विक्री केल्याचे उघड झाले. गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, मुकेश खरात, प्रदीप घोडके, अनंत शिरसाट व शिपाई रूपाली दाईनगडे (तांत्रिक साहाय्य) यांनी करण शाह (२९), दर्शन गोहिल (२४), परेश नेवरेकर (३५) तसेच कविष पाटील (२४) यांना अटक करण्यात आली आहे.

३५ लाखांचा मुद्देमाल जप्तआरोपींकडून ३० लाख रुपयांचे बनावट पास, होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप, प्रिंटर व इतर साधन सामग्री मिळून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी करण शहा हा ग्राफिक डिझायनर असून त्याने फर्झी नामक वेब सिरीजवरून प्रोत्साहित होऊन हा गुन्हा केला आहे.- सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमएचबी कॉलनी पोलिस ठाणे

टॅग्स :गरबा