Join us

कोठडीतून पसार झालेली महिला चोर सापडली

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

पश्चिम उपनगरात चोऱ्या करणारी नागरिकांच्या डोईजड झालेली सराईत महिला चोर पोलिसांच्या हाती लागली. मात्र ही आरोपी महिला पोलिसांच्या कोठडीतून सफाई कामगाराचा मोबाईल

मुंबई : पश्चिम उपनगरात चोऱ्या करणारी नागरिकांच्या डोईजड झालेली सराईत महिला चोर पोलिसांच्या हाती लागली. मात्र ही आरोपी महिला पोलिसांच्या कोठडीतून सफाई कामगाराचा मोबाईल घेऊन ओशिवारा पोलीस ठाण्यातून पसार झाली होती. पोलिसांनी ताबडतोब तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बोरिवली परिसरातून तिला अटक करण्यात आले आहे. भारती शिंदे असे आरोपी महिलेचे नाव आहे.नालासोपारा येथील रहिवासी असलेली भारती शिंदे मोलकरीण म्हणून काम करते. या पूर्वी समता नगर आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे. मोलकरीण म्हणून काम करायचे. त्यानंतर घरातील सामान घेऊन पसार व्हायचे अशी तिची कार्यशैली होती. गेल्या अनेक दिवसापासून पोलीस तिच्या मागावर होते. ओशिवारा परिसरातील एका घरात ती मोलकरीण म्हणून कामाला लागली होती. याची माहिती ओशिवारा पोलिसांना मिळाली. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ती घरातील सामान घेऊन पसार होणार त्यापुर्वीच ओशिवारा पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. तिला अटक करुन ओशिवारा पोलीस ठाण्यात आणले. पहाटेची वेळ असल्याने सफाई कामगार महिलेकडून साफ सफाई सुरु होती. दुसरीकडे तिच्यावर नजर ठेऊन असलेले पोलीस हवालदार हे देखील शिंदे हिला एकटेच सोडून बाहेर गेले. याच संधीचा फायदा घेत शिंदेने सफाई कामगार महिलेचा मोबाईल घेऊन पळ काढला. काही वेळात परतलेल्या हवालदारांना शिंदे पसार झाल्याचे समजतात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)