Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस टक्के ज्येष्ठांकडे होतेय दुर्लक्ष!

By admin | Updated: June 15, 2014 01:35 IST

आजी - आजोबा घरात असले की एक आधार असतो, कोणतेही काम करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ही संस्कृती मुंबईसारख्या शहरात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे.

मुंबई : आजी - आजोबा घरात असले की एक आधार असतो, कोणतेही काम करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, ही संस्कृती मुंबईसारख्या शहरात कुठेतरी हरवत जाताना दिसत आहे. कारण, ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे घरातील व्यक्ती दुर्लक्ष करीत आहेत, तर देशामध्ये हे प्रमाण २४ टक्के इतके असल्याचे हेल्प एज इंडियाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.१५ जून हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, मुंबईमध्ये ८७ टक्के ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाबरोबर राहतात. मात्र या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी आनंदी आयुष्य जगता येत नाही. बाहेरील व्यक्ती नाही, तर स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तीच ज्येष्ठ नागरिकांचा छळ करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. २०१३मध्ये प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणानुसार, ८१ टक्के सुना या आपल्या सासू - सासऱ्यांना त्रास देत असल्याचे आढळून आले होते. मात्र एका वर्षात हा टक्का १० टक्क्यांनी वाढलेला आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या सर्वेक्षणामध्ये सुनेकडून होणाऱ्या त्रासाचा आकडा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आई - वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाच्या टक्केवारीतही वाढ झालेली आहे. १३ टक्के मुले आई - वडिलांना त्रास द्यायचे, तर हा टक्का आता २१ वर पोहोचला आहे. आपलीच मुले - सुना आपल्याला त्रास देत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होतो. गेली पाच वर्षे आम्ही दरवर्षी सर्वेक्षण करीत आहोत. यामध्ये या त्रासाचा टक्का वाढतानाच दिसत आहे. या मुले - सुनांमध्ये जनजागृती केली पाहिजे. यांच्या वागण्यात बदल झाल्यास अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुसह्य होईल, असे मत हेल्प एज इंडियाचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी व्यक्त केले. ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष होते तर २० टक्के ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ ऐकावी लागते; वैयक्तिक पातळीवर ३८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना अपशब्द ऐकावे लागत असल्याचे चित्र मुंबईमध्ये दिसून येत आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. मुंबईमध्ये ४ टक्के ज्येष्ठ नागरिक महिला या एकट्याच राहत आहेत तर ६ टक्के ज्येष्ठ नागरिक हे पती - पत्नी बरोबर राहत आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अत्याचार या विषयाकडे आता गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. कारण १०० टक्के ज्येष्ठ नागरिकांनी छळ झाला तरी याविषयी बोलण्याचे आमच्याकडे धैर्य नसल्याचे सांगितले आहे. तर ५० टक्के जणांनी यावर काय उपाय आहे, हेच माहीत नसल्याचे सांगितले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक हे मूल आहे म्हणून गप्प राहतात. हे योग्य नाही, असे बोरगावकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)