Join us  

गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही; पर्यटन विभागाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 1:51 PM

वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

मुंबई - गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर राज्य सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये असं स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी दिलं आहे. 

वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल असा विश्वास पर्यटन विभागाने लोकांना दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार अशी बातमी आल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 25 किल्ले एमटीडीसी हॉटेल आणि हॉस्पिटीलिटी चेन्सना भाडेतत्वावर देणार आहे असं एका इंग्रजी वृत्तपत्राने छापलं होतं. मात्र या वृत्तानंतर अनेक स्तरातून सरकारचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया आल्याने पर्यटन विभागाने हे स्पष्टीकरण दिलं आहे. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजपर्यटनगड