Join us  

माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:00 AM

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी काम पाहिले. पंजाब करार, परदेशी घुसखोरीमुळे धुमसणाºया आसाममध्ये स्थैर्य आणि शांततेसाठी आसू या विद्यार्थी संघटनेला सोबत घेत आसाम करार, बंडखोर मिझोराम नॅशनल फ्रंटच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठीचा मिझोराम करार अशा विविध महत्त्वाच्या प्रसंगांत प्रधान यांनी मोलाची कामगिरी बजावली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी, सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. सायंकाळी चर्नी रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

राम प्रधान १९५२ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली. राज्यात आणि केंद्रात विविध पदे भूषवितानाच संयुक्त राष्ट्रसंघातील जबाबदाऱ्याही पार पाडल्या. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. १९६२ साली यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षणमंत्री झाले तेव्हा राम प्रधानही केंद्रात गेले. १९६७ साली भारताचे निवासी प्रतिनिधी म्हणून जिनिव्हा येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८५ साली ते केंद्रीय गृह सचिव बनले.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी काम पाहिले. पंजाब करार, परदेशी घुसखोरीमुळे धुमसणाºया आसाममध्ये स्थैर्य आणि शांततेसाठी आसू या विद्यार्थी संघटनेला सोबत घेत आसाम करार, बंडखोर मिझोराम नॅशनल फ्रंटच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठीचा मिझोराम करार अशा विविध महत्त्वाच्या प्रसंगांत प्रधान यांनी मोलाची कामगिरी बजावली. केंद्रीय गृह सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर १९८७ ते ९० या कालावधीत ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपालही होते. १९८७ साली त्यांना पद्मभूषणनेही सन्मानित करण्यात आले.

सनदी अधिकारी म्हणून या प्रसंगात त्यांनी चोख कामगिरी बजावली. निवृत्तीनंतरही विविध पेचप्रसंगांत केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी त्यांच्या अनुभवाचा लाभ घेतला. राम प्रधान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.