Join us  

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 7:12 PM

माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हे काँग्रेसवासी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

मुंबई- माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हे काँग्रेसवासी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभय ठिपसे यांनी मुंबई उच्च न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालयांचं न्यायाधीशपदही भूषवलं आहे. ठिपसे यांनी सोहराबुद्दीन इन्काऊंटर प्रकरणावरूनच भाजपावर टीका केली होती.सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अनेक अनियमितता आढळल्या आहेत. या खटल्याबाबत प्रश्न उपस्थित करत अनेक बड्या आरोपींना मुक्त केल्याचा आरोप अभय ठिपसे यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी करणारे दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्या पूर्वी न्या. जे. टी उत्पात सुनावणी करत होते. त्यांची अचानक आणि लवकर बदली झाली. तेथेही संशयाला वाव असल्याचे ठिपसे म्हणाले होते. त्याचबरोबर या सुनावणीत इतके गुप्त काय आहे, असा प्रश्नही त्यांनी सीबीआय खटल्याच्या मागील एका निर्णयाबाबत उपस्थित केला होता.साधारणपणे खुली सुनावणी केली असता पारदर्शी कारभार होतो आणि आरोपीला सुरक्षित वाटते. त्यामुळे गुप्त सुनावणी घेण्यात हाय हशील आहे हे समजत नाही, असे ठिपसे म्हणाले होते.