Join us  

राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फ़ोर्सच्या अध्यक्षपदी माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची नियुक्ती

By मनोहर कुंभेजकर | Published: June 20, 2023 8:24 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई - कुपोषणाचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होण्यासाठी माता मृत्यू बाल मृत्यू याला आळा बसावा , विविध संसर्ग जन्य आजारावर नियंत्रण यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज टास्क फोर्स ची घोषणा केली.राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचे राज्याच्या कुपोषण निर्मूलनातील योगदान उल्लेखनीय आहे. हे लक्षत घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फ़ोर्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी भांडूप मध्ये जाहीर केली. या टास्क फोर्स मध्ये महिला बाल विकास, आरोग्य, आदिवासी,  कृषी, अन्न व नागरी पुरवठा याच्या अप्पर सचिव /सचिव/प्रधान सचिव यांच्या समावेशाबरोबर आयुक्त याचाही समावेश आहे,

भांडुप पश्चिम येथील नवजीवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शिक्षणमहर्षी रामचंद्र सावंत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण व डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना काळात प्रामुख्याने लोकमतमध्ये केलेल्या  स्तंभ लेखन पुस्तकं रूपाने प्रकाशित केले आहे. यावेळी त्यांच्या “गुलदस्ता” या पुस्तकाचे प्रकाशन  मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर नवजीवन संस्थेचे सरचिटणीस डॉ दीपक सावंत, संस्थेचे अध्यक्ष अँड दीपक साळवी, माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार अशोक पाटील,अनिला दीपक सावंत,अनुष्का स्वप्नेश सावंत यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियानही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.याच माध्यमातून भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येईल व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.    मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५० रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार आहे. म्हाडा एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. भांडुप आणि परिसरातील पुनरविकासाचे प्रकल्प, रस्ते, नाला सफाई तसेच सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच या भागातील नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु  करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विक्रोळी येथे ५०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. प्राचार्य रामचंद्र सावंत यांनी लावलेल्या नवजीवन संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असेच आहे. शिक्षण हे आपल्या परिवर्तनाचे प्रमुख साधन असून प्रत्येकाने आपली क्षमता, कुवत ताकद ओळखून कार्य करावे. प्रत्येक जण कर्माने मोठा असतो तेव्हा प्रत्येकाने चांगले कर्म करण्यावर भर द्यावा असेही ते यावेळी म्हणाले.

डॉ. दीपक सावंत यांनी प्रास्ताविका मध्ये आपले पिताश्री  प्रा. रामचंद्र सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमास भेट देवून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :दीपक सावंतएकनाथ शिंदे