Join us

माजी निर्वाचन आयुक्तांच्या पत्नीलाही फसवले

By admin | Updated: July 7, 2015 03:13 IST

प्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांची नक्कल बनवून माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्नीलाही फसवल्याचे निदर्शनास आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई प्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांची नक्कल बनवून माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्नीलाही फसवल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी बलवंतसिंग ठाकूर याच्यावर दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल झाली होती. मात्र यानंतरही त्याचा बनावट पेंटिंग विक्रीचा गोरखधंदा देशभर सुरूच आहे.प्रसिद्ध कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांची नक्कल बनवून ती लाखो रुपयांना विकणाऱ्या बलवंतसिंग ठाकूर याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार आली आहे. कोपरखैरणेचे रहिवासी प्रेमसिंग सावित्री यांना त्याने ४० लाखांना बनावट चित्र विकून त्यांची फसवणूक केली होती. मात्र छायाचित्रांची पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी आपल्याकडे आहे, असे त्याचे म्हणणे आहे. त्यावरून पोलिसांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केलेली नाही. परंतु ठाकूर याने प्रेमसिंग यांच्यासह इतरही अनेकांची अशा प्रकारे लाखोंची फसवणूक केली असून, त्यामध्ये माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्नीचाही समावेश आहे. २००९ मध्ये त्याने माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्या पत्नी रुपिका चावला यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांनी ठाकूरच्या विरोधात दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रारदेखील केली आहे. राजा रवी वर्मा यांनी काढलेल्या मूळ चित्राऐवजी ठाकूरने त्यांना बनावट चित्र विकले होते. तसेच ते चित्र खरे असल्याचे बनावट प्रमाणपत्रही दिले. परंतु ही बाब उघड होताच रुपिका चावला यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला इंदूरच्या पत्त्यावर पाठवलेले पत्रही त्याने न स्वीकारल्याने ते परत आले होते. यावरून प्रसिद्ध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांची हुबेहूब नक्कल बनवून ती विकण्याचे मोठे रॅकेट देशभर चालत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. हौसेला मोल नसल्याने अनेक जण लाखो रुपये मोजून घराच्या भिंतीची शोभा वाढवण्यासाठी अशी चित्रे विकत घेतात. (प्रतिनिधी)